Tuesday, 31 May 2016

प्रसुती - सिझेरिअन योग्य की अयोग्य - नक्की वाचा

प्रसुती - सिझेरिअन योग्य की अयोग्य - नक्की वाचा ================================== सिझेरिअन’ हा शब्द आता सर्रास कानावर येतो. कुणी प्रसूत झाली असं कळलं की, लोक हमखास पहिला प्रश्न विचारतात, सिझर की नॉर्मल? सिझर हेच उत्तर सर्रास कानावर येतं. पुढे पालूपदही जोडलं जातं की, आता तर काय सिझर नॉर्मल झालेत! पण खरंच हे सिझेरिअन करणं म्हणजे गरोदर स्त्रीच्या पोटावर आणि गर्भाशयावर छेद घेऊन बाळ बाहेर काढण्याची शस्त्रक्रिया इतकी सर्रास करण्यासारखी गोष्ट आहे का? या शस्त्रक्रियेचा प्रचार साधारण: 6-7 वर्षापूर्वी प्रतिजैविकांचा शोध लागल्यानंतर झाला. आज मात्र इतक्या मोठय़ा प्रमाणात आणि बेजबाबदारपणो ही शस्त्रक्रिया जगभर केली जात आहे. खरंतर गरोदरपण आणि प्रसूती या स्त्रीच्या आयुष्यात घडणारया नैसर्गिक घटना आहेत. गरोदरपण आणि प्रसूती हे काही आजार नाहीत. शुक्राणू आणि स्त्रीबीज यांच्या समन्वयापासून ते अडीच-तीन किलोचा पूर्ण वाढ झालेला हाडांमासांचा जीव तयार होण्याची ही प्रक्रिया आणि त्या बाळाचा योनी मार्गातून बाहेर पडण्याचा पहिला प्रवास या दोन्ही गोष्टी अतिशय गुंतागुंतीच्या आणि किचकट प्रक्रिया असल्या तरी परमेश्वराने त्या अतिशय सहज आणि सोप्या करून ठेवल्या आहेत. त्यामुळेच, शंभर गरोदर स्त्रियांपैकी पंचाण्णव स्त्रियांची प्रसूती ही नैसर्गिकरीत्या, कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि कोणाच्याही मदतीशिवाय होत असते. फक्त 5 टक्के स्त्रियांची प्रसूती ही अवघड असते; या पाचपैकी 4 टक्के स्त्रियांना प्रशिक्षित परिचारिका अथवा तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीची गरज भासते. फक्त 1 टक्का स्त्रियांची प्रसूती नैसर्गिकरीत्या होणं अशक्य असतं. अशा स्त्रियांचा आणि त्यांच्या पोटातील बाळाचा जीव वाचविण्यासाठी सिझेरिअन शस्त्रक्रियेची गरज भासते. प्रत्यक्षात आज काय परिस्थिती आहे? आज मोठय़ा शहरांमध्ये 50 टक्यांपेक्षा जास्त प्रसुती सिझेरिअन शस्त्रक्रियेद्वारा केल्या जातात. तालुक्याच्या ठिकाणी हे प्रमाण थोडं कमी, म्हणजे 30 ते 40 टक्के आहे. पण दोन्ही ठिकाणी इतक्या झपाटय़ाने ही टक्केवारी वाढते आहे की काही वर्षानंतर नैसर्गिक प्रसूती ही वर्तमान पत्रातील चार कलमी ठळक बातमी ठरावी किंवा वैद्यकीय विद्यार्थींना शिकविण्यासाठी तयार केलेला दुर्मीळ व्हिडीओ म्हणून त्याचा विचार व्हावा. अगदी साधी गोष्ट आहे. सिझेरिअन शस्त्रक्रियेचे बिल नैसर्गिक प्रसूतीच्या बिला पेक्षा किमान पाच ते दहा पटींनी जास्त असते. आज पैसा कुणाला नको आहे? नैसर्गिक प्रसूतीसाठी डॉक्टर आणि पेशंट दोघांना वाट पहावी लागते; स्त्रीला कळा सोसाव्या लागतात; डॉक्टरांना डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेऊन प्रसूतीच्या प्रत्येक टप्प्याचे निरीक्षण करावे लागते, ते नोंदवून ठेवावे लागते. एवढे करूनही आई किंवा बाळाच्या बाबतीत जर चुकून काही अपघात झालाच, तर डॉक्टरला मारहाण, हॉस्पिटल वर दगडफेक, वर्तमानपत्रात बदनामीकारक बातमी, वर्षानुवर्षे ग्राहक कोर्टात आणि फौजदारी कोर्टात चालणारे खटले हे शुक्लकाष्ठ मागे लागते. या उलट सिझर करणं अतिशय सोपं. बधिरीकरण (भूल) शास्त्रात झालेल्या प्रगतीमुळे, महागडय़ा परंतु परिणामकारक प्रतिजैविकांमुळे, भूलतज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमुळे, रक्तपेढय़ांच्या जाळ्यामुळे सिझेरिअन शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूप सोपी आणि निर्धोक झाली आहे. या शस्त्रक्रियेमुळे रुग्ण दगावण्याची शक्यता नगण्य, म्हणजे लाखात एक इतके कमी झाले आहे. त्यामुळे ना डॉक्टरांची रिस्क घेण्याची तयारी आहे ना, पालकांची! मात्र नैसर्गिक प्रसूतीचे रूपांतर सिझेरिअनमध्ये करण्याचा डॉक्टरांचा निर्णय 90 टक्के वेळा चुकीच्या गृहितकावर आधारलेला असतो. बाळाच्या आणि आईच्या जिवाची भीती घातली, की आधीच धास्तावलेले नातेवाइक लगेचच ऑपरेशनला परवानगी देतील, अशी डॉक्टरांना खात्री असते. कळांनी अर्धमेली झालेली पेशंट नातेवाइक ऐनवेळी कोठे घेऊन जाणार? आणि अशी ऐनवेळी आलेली पेशंट प्रसूतीसाठी घेण्याची पद्धत आजकाल शहरात काय, पण खेडय़ात सुद्धा नाही. प्रसूतीसाठी सिझेरिअनचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी काय उपाय योजना करता येतील, याविषयी आज जगभर विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहे. तथापि, नैसर्गिक प्रसूतीचे सिझरमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय हा पूर्णपणे संबंधित स्त्रीच्या बाळंतपणात काळजी घेणारया डॉक्टरांचा आणि ऐनवेळी घेतला जाणारा निर्णय असल्याने आणि हा निर्णय आई आणि बाळाचे प्राण वाचविण्या साठी घेतला जात असल्याने कोणत्याही पातळीवर या निर्णयाला आव्हान देणं अशक्य आहे. शासकीय आणि खाजगी रुग्णालयातील प्रत्येक सिझरचे ऑडिट करण्याचा प्रस्तावही मध्यंतरी विचाराधीन होता; पण संबंधित डॉक्टरांच्याच विरोधाने तो बारगळला. नैसर्गिक प्रसूतीची वाट पाहणारे, सिझेरिअनचा पर्याय टाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारे डॉक्टर्स आज खूप कमी आहेत हे वास्तव आहेत. वाट पाहणे, ही प्रसूतीशास्त्रतील एक सुंदर कला आहे. इंग्रजीत तिला Masterly Inactivity असं नाव आहे. जरूर ती सर्व काळजी घेऊन, जरूर ती सर्व निरीक्षणं नोंदवून आणि जरूर त्या सर्व तपासण्या करून, नंतर निसर्गाला आपलं काम करू देण्यासाठी शांतपणे वाट पहायची. ही कला आत्मसात करणं वाटतं तितकं सोपं जरी नसलं तरी फार अवघड आणि अशक्यही नाही. अतिशय अवघड परिस्थितीत, सर्व अडथळ्यांवर मात करून, नैसर्गिक प्रसूती करण्यात जो आनंद आणि समाधान डॉक्टर आणि पेशंटला मिळतं ते सिझेरिअन करून मिळणारा पैसा आणि समाधाना पेक्षा खुप उच्च प्रतीचं असतं, हे मी गेल्या पस्तीस वर्षात खूपदा अनुभवलेलं आहे. सिझेरिअन करण्याआधी किती वाट पहावी, याबाबतचा इ.स. 1500सालातील एक किस्सा शेवटी सांगतो. ही घटना स्वित्झर्रलंड मधील आहे. त्या काळी सिझेरिअन शस्त्रक्रिया जिवंत स्त्रीवर करण्यास कायद्याने बंदी होती. गरोदर स्त्रीचा अकस्मात इतर काही कारणाने अपघाती मृत्यू ओढवला, तर बाळाला वाचविण्यासाठी मयत स्त्रीचे पोट कापून बाळ बाहेर काढले जाई. जेकॉब न्यूफर नावाच्या इसमाने आपल्या पत्नीचे सिझेरिअन ऑपरेशन करण्याची परवानगी स्थानिक प्रशासनाकडे मागितली. सदर स्त्री सहा दिवस प्रसूतीच्या कळा देत होती आणि तेरा परिचारिकांनी तिची प्रसूती करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. सहा दिवस वाट पाहूनही प्रसूती होईना, म्हणून अखेर सिझेरिअन ऑपरेशनची परवानगी प्रचंड वादावादी नंतर देण्यात आली. ऑपरेशननंतर बाळबाळंतीण सुखरूप असल्याची दुर्मीळ घटना घडली. त्या स्त्रीने नंतर पाच मुलांना नैसर्गिकरीत्या जन्म दिला. त्यातील एक जुळे होते. सिझेरिअनने जन्माला आलेली मुलगी पुढे 77 वर्षे जगली आणि भरपूर म्हातारी होऊन मेली. तुम्ही न्यूपर इतकी वाट पाहू नका, पण थोडी तरी वाट पहायला काय हरकत आहे? सिझर करण्यासाठी सांगितली जाणारी ४ कारणं. १.बाळाच्या गळ्याला नाळेचे वेढे आहेत. -सिझर करायला हवं ‘‘बाळाच्या गळ्यात नाळेचे वेढे आहेत’’ असं डॉक्टर अनेकदा सांगतात. आणि सिझर करायला चटकन राजी होतात. पण हे खरं नव्हे. पोटातील बाळाला प्राणवायूचा आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा नाळेवाटे होत असतो. गर्भातील बाळाची फुफ्फुसे तयार झालेली नसतात (जन्मल्यावर बाळ पहिल्यांदा श्वास घेते, तेव्हाच फुफ्फुसाचे कार्य सुरू होते). त्यामुळे नाळेचे हजार वेढे जरी बाळाच्या मानेभोवती पडले, तरी नाळेतून होणारा रक्तपुरवठा कायम असल्याने बाळाला काहीही त्रास होण्याचा प्रश्नच नसतो. वस्तुत: गर्भाशयातील पाण्याच्या डोहात मनसोक्त फिरत असताना बाळाच्या मानेभोवती नाळेचे वेढे पडणं, ही पूर्णपणे नैसर्गिक क्रिया आहे. नैसर्गिक प्रसूती होताना हे वेढे प्रसूती समयी जवळ असलेल्या डॉक्टर अथवा परिचारिकेला नेहमीच दिसत असतात आणि बाळाला त्यामुळे कधीही काहीही त्रास होत नाही. २.गर्भाशयातील पाणी कमी झालंय. -गर्भाशयातील पाणी कमी होतंय आणि बाळ कोरडं पडतंय हे सिझरचं दुसरं कारण. हे कारण सुद्धा पहिल्या कारणाइतकंच तकलादू आहे. गरोदरपणातील नऊ महिन्यांपैकी पहिल्या सात महिन्यात बाळाची वाढ कमी आणि पाण्याची वाढ जास्त असते. या उलट सातव्या महिन्यानंतर गर्भाशयात बाळ वेगाने वाढू लागतं आणि पाणी त्याप्रमाणात कमी होऊ लागतं. याचाच साधा अर्थ असा की, गर्भाशयातील पाणी कमी होण्याची प्रक्रिया प्रसूतीच्या दोन महिने अगोदर सुरू झालेली असते. बरेचदा, प्रसूतीच्या कळा सुरू होण्यापूर्वी पाणमूठ फुटून गर्भाशयातील बरंच पाणी निघून जातं आणि त्यानंतर 24 तासात नैसर्गिक कळा सुरू होतात. काही वेळा, दिवस उलटून गेल्यावर कळा सुरू करण्यापूर्वी पाणमूठ फोडणं हा पूर्वापार चालत आलेला उपाय आहे. यात अनैसर्गिक असं काहीही नाही. बाळ कोरडं पडेल, हे डॉक्टरांच्या अचाट कल्पनाशक्तीचे उदाहरण आहे. या व्यतिरिक्त त्या विधानाला काहीही अर्थ नाही. ३.बाळानं पोटात शी केली. -प्रसूतीची प्रत्येक कळ बाळाला गर्भाशयातून खाली ढकलण्यासाठी आणि गर्भाशयाचे तोंड उघडण्यासाठी असते. बाळाच्या पोटावर या क्रियेने दाब पडला, की बाळाला शी होणं ही अशीच नैसर्गिक क्रिया आहे. उलट अशी शी होणे, हे बाळाचे गुदद्वार आणि आतडी पूर्णपणे विकसित आणि नॉर्मल असल्याचे लक्षण आहे. ही विष्ठा जंतु विरहित असते. त्यामुळे बाळाने अशी शी गिळली, तरीही त्याला या शी पासून काहीही धोका नसतो. बाळाच्या जन्मानंतर लगेचच सक्शन मशिनने ही शी बाहेर काढून टाकण्याची पूर्वापार पद्धत आहे. पण बाळानं पोटात शी केली हे कारण सांगून हल्ली सर्रास सिझर केलं जातं. ४.बाळाचे ठोके अनियमित झाले आहेत. -गर्भाशयाच्या प्रत्येक आकुंचनाबरोबर बाळाचा रक्तपुरवठा कमी होत असतो; बाळाचे ठोके अनियमित होत असतात. दोन कळांमधील काळात हा रक्तपुरवठा आणि ठोके पूर्ववत होतात. ही क्रिया बाळाचा जन्म होईस्तोवर चालू असते. कळा सहन करण्याची बाळाची ताकद अमर्यादित असते, हे सत्य प्रसूती प्रक्रियेस मदत करताना मी हजारो वेळा अनुभवलेले आहे. दोन दोन अथवा तीन तीन दिवस घरी कळा देऊन नंतर माझ्याकडे येऊन नैसर्गिक प्रसूती झालेल्या बाळाची तब्येत आणि रडणं खणखणीत असते. त्यामुळे बाळाचे ठोके अनियमित झालेत असं सांगणं हेदेखील एक फसवं कारण आहे. डॉ. अशोक माईणकर (लेखक सासवड, ता. पुरंदर, जि.पुणे येथे स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आहेत. या क्षेत्रात कामाचा त्यांना 35 वर्षाहून अधिक अनुभव आहे.) एक सत्य जनसामांन्यापर्यंत पोहचविण्यासाठी..! टीप: सर्वच डॉक्टर असे करतात असे नाही, त्यामुळे सर्वांना वेठीस धरणे चुकीचे ठरेल.. हा मेसेज आम्हाला व्हाट्सअँप वर मिळाला आहे. जसाच्या तास आम्ही पोस्ट केला आहे. अधिक माहिती साठी आपले फेसबुक पेज लाइक करा.. आणि ज्यास्तीत ज्यास्त शेयर करा

Friday, 27 May 2016

वायफाय टॉकी फ्री

वायफाय टॉकी फ्री

या वाय-फायची रेंज ही फोन किंवा टॅबलेटमधील हार्डवेअरच्या तंत्रज्ञानावर अवलंबून असते.

आज आपण मोबाइल फोन कशाकशासाठी वापरतो? फोटो आणि विशेष म्हणजे सेल्फी काढण्यासाठी, प्रवासात गाणी ऐकण्यासाठी किंवा सिनेमा पाहण्यासाठी आपल्या आवडलेले चुटके, व्हिडीओ क्लिप्स आपल्या मित्रमंडळी किंवा नातेवाईकांशी शेअर करण्यासाठी? खरे तर हा फोन संपर्काचे साधन म्हणून बनवला गेला असला तरी आपण त्याचा उपयोग मनोरंजनाच्या विविध गोष्टींसाठी करीत असतो. पण जर समजा तुमच्याकडे वाय फाय इंटरनेट नसेल किंवा सिम कार्डावर पैसे किंवा डेटा बॅलन्स नसेल तर काय होईल? आज याचेच उत्तर आपण पाहणार आहोत. कुठल्याही मोबाइल सव्‍‌र्हिस प्रोव्हाडरला किंवा वाय फायला पैसे न भरता तुम्ही आपल्या मित्रमंडळींचा गट बनवून मनसोक्त विनामूल्य चॅट किंवा गप्पा मारू शकता. यासाठी वायफाय टॉकी फ्री (ह्र-ा्र ळं’‘्रीो१ी) हे अ‍ॅप्लिकेशन तुमच्या मदतीला येईल. हे अ‍ॅप्लिकेशन सुरू करून तुम्हाला तुमचा फोन वाय-फायचा हॉट स्पॉट बनवता येतो. या हॉट स्पॉटच्या रेंजमध्ये असलेल्या तुमच्या मित्र-मैत्रिणींशी संपर्क साधता येईल. या वाय-फायची रेंज ही फोन किंवा टॅबलेटमधील हार्डवेअरच्या तंत्रज्ञानावर अवलंबून असते. इमारतींमध्ये ही साधारणपणे ७० ते १५० फूट असते तर मोकळ्या मैदानात ४५० फुटांपर्यंत जाऊ शकते. थोडक्यात म्हणजे एका इमारतीत राहणारी मित्रमंडळी किंवा मॅच बघायला मैदानात गेलेला मित्रांचा गट हे अ‍ॅप वापरून संपर्कात राहू शकतो. या प्रक्रियेत प्रथम ग्रुपमधील सर्व हे अ‍ॅप आपापल्या स्मार्ट फोनवर इन्स्टॉल करतात. अ‍ॅपमधील नेटवर्क मॅनेजर सुविधा वापरून त्यापैकी एकाचा फोन हॉट स्पॉट बनवला जातो. या हॉटस्पॉटचा पासवर्ड गटातील सर्वाना सांगून त्यांचे फोन या हॉट स्पॉटशी जोडले जातात. एकदा असा ग्रुप जोडला गेला की तो एकमेकांशी वैयक्तिक किंवा सर्व ग्रुपशी एकत्र चॅट करू शकतो. याद्वारे फाइल्स, फोटोही शेअर करता येतात. तसेच व्हॉइस कॉलही करता येतात.या अ‍ॅपचे वैशिष्टय़ म्हणजे वाय फाय सिग्नल कमी असला तरी आवाजाची गुणवत्ता चांगली असते. शिवाय तुम्हाला स्पीकर फोन, तसेच ब्लू टुथ हेडसेटही या अ‍ॅपसोबत वापता येतो. या लेखात जरी ‘वाय फाय टॉकी फ्री’ या अ‍ॅपची माहिती दिलेली असली तरी यासारखे अनेक अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. त्यातील काही वाय-फाय तंत्रज्ञान वापरतात तर काही ब्लूटुथद्वारे एकमेकांशी संपर्क साधतात. प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार त्याची निवड करावी. एकही पैसा खर्च न करता आपले फोन वॉकी-टॉकीसारखे वापरण्याचा खेळ करून पाहायला तुम्हाला नक्कीच आवडेल.

हिशेबात चोख राहा! मोबाईल अँप

अ‍ॅपची शाळा : हिशेबात चोख राहा!

हे काम सोपे करण्यासाठी स्प्लिटवाइज (Splitwise) हे अ‍ॅप स्मार्टफोनधारकांना उपलब्ध आहे.

शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर परगावी राहणाऱ्या मित्रांच्या/मैत्रिणींच्या गटाने एखादा फ्लॅट भाडय़ाने शेअर करणे किंवा दोन-तीन कुटुंबांनी एकत्र येऊन एखादी सहल किंवा मोठा प्रवास करणे किंवा अनेक मित्रांनी एकत्र येऊन एखाद्या मित्राला वाढदिवसाची पार्टी देणे असो, या सर्व बाबींमध्ये सामाईक गोष्ट असते ती म्हणजे झालेल्या खर्चाची नीट नोंद ठेवून तो योग्य प्रमाणात वाटून घेणे. तसे हे बऱ्यापैकी जिकिरीचे काम असते. प्रत्येक सदस्याने केलेला खर्च वेगवेगळा नोंदवून सदस्य संख्येच्या प्रमाणात विभागणी करणे. यातच काही खर्चाचे वाटेकरी वेगवेगळे असणे यांसारखी गुंतागुंत असू शकते. हे काम सोपे करण्यासाठी स्प्लिटवाइज (Splitwise) हे अ‍ॅप स्मार्टफोनधारकांना उपलब्ध आहे. (सदर अ‍ॅप संगणक, लॅपटॉप यावरदेखील उपलब्ध आहे) ज्या मित्रमंडळींमध्ये खर्च विभागायचा आहे त्यांचा व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणे ग्रुप बनवावा लागतो. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये जसे अनेक ग्रुप बनवता येतात त्याचप्रमाणे येथेही गरजेनुसार एकापेक्षा जास्त ग्रुप बनवता येतात. उदाहरणार्थ घर शेअर करणाऱ्यांचा गट, ऑफिसमध्ये एकत्र पार्टी करणाऱ्यांचा गट इत्यादी इत्यादी. या गटातील प्रत्येक सदस्याकडे ह्या ग्रुपचे सदस्यत्व असावे लागते. आता हे अ‍ॅप कसे काम करते ते पाहू. घर शेअर करणारे मित्र स्वत: केलेल्या खर्चाची नोंद या अ‍ॅपवर आपापल्या मोबाइलवर करतात. उदाहरणार्थ एकाने घरभाडे भरले असेल, दुसऱ्याने वीज बिल, तर तिसऱ्याने किराणा सामान आणले असेल आणि महिन्याच्या शेवटी हिशेब पूर्ण करायचे असे ठरले असल्यास शेवटी कोण कोणाला किती पैसे देणे लागतो याचा हिशेब अ‍ॅप तुम्हाला करून देते. (तुम्ही सांगितल्यास आठवण म्हणून तसा ईमेलही पाठवते.) जर अनेक मित्र एकत्र हॉटेलमध्ये जाऊन जेवले असल्यास कोणी काय काय मागवले यावरही बिलाची विभागणी करता येते. त्यामुळे शाकाहारींना मांसाहाराचे पैसे भरावे लागत नाही. शिवाय हे जेवण एखाद्याच्या वाढदिवसासाठी असेल तर ज्याचा वाढदिवस आहे त्याला बिल शेअिरगमधून वगळण्याची सोय आहे. मित्रांमध्ये गरजेला हातउसने पैसे घेण्याची सवय असते. अशा वेळी आपण कोणाला पैसे उसने दिले व कोणाकडून घेतले याची नोंद करण्याची सोयही या अ‍ॅपमध्ये आहे. सेटिंगमध्ये योग्य तो पर्याय निवडल्यास उसन्यांचा हिशेब नक्की काय झाला ते हे अ‍ॅप तुम्हाला सांगते. आपले अशा प्रकारचे वैयक्तिक हिशेब इतरांनी पाहू नये, असे वाटत असल्यास बोटाचे ठसे पासवर्डप्रमाणे वापरण्याची सुविधा या अ‍ॅपमध्ये दिलेली आहे. अर्थातच त्यासाठी स्मार्ट फोनमध्ये फिंगर प्रिंट स्कॅनर असणे गरजेचे आहे. (हल्लीच्या बऱ्याच फोन्समध्ये तो असतो.) अनेक जणांनी एकत्र येऊन करायच्या कार्यक्रमांमध्ये पैशांचे हिशेब ठेवण्याचा त्रास कमी करणारे हे विनामूल्य अ‍ॅप खरोखरच बहुमूल्य आहे. याच प्रकारातील आणखी काही अ‍ॅप्स तुम्हाला गुगल स्टोअरवर दिसतील. प्रत्येकाने आपल्या आवडीप्रमाणे आणि गरजेप्रमाणे त्याची निवड करावी.

कमाल कृत्रिम बुद्धिमत्तेची

☺कमाल कृत्रिम बुद्धिमत्तेची ☺

आज तंत्रज्ञान क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आपण प्रचलित भाषेनुसार आपण तिला चॅटबॉट म्हणू,

  आज किंवा आपल्या संपूर्ण आयुष्यात आपण किती लोकांशी बोललो? किती वाक्यांची देवाण-घेवाण झाली? एकूण किती शब्द वापरले? कोणते शब्द एकदाच वापरले? कोणत्या शब्दांची किती वेळा पुनरुक्ती झाली? त्यातील जोडाक्षरे कोणती होती? अमुक एके दिवशी किती नवीन शब्द वापरात आले? त्या दिवशी किती लोकांशी बोलणं झालं? त्यापकी प्रत्येक व्यक्तीकडून मिळालेल्या नवीन शब्दांची संख्या किती? एका शब्दाचे किती वेगवेगळे संदर्भ समजले?.. हे सगळे हिशेब आपण बोलताना ठेवू लागलो तर या हिशेबानेच डोकं गरगरू लागेल. क्षणोक्षणी यातील आकडेमोड पुन:पुन्हा व्यवस्थित करताना तोंडाला फेस येईल. या संदर्भात घोटाळे होतील किंवा सुसूत्रता कोलमडेल. पण हे सगळं चॅटबॉट्स व्यवस्थित करू शकतात. आजमितीला बरेच चॅटबॉट्स जरी अस्तित्वात असले तरी त्यांच्या शब्दसंपदेची, शब्दांना जोडून येणाऱ्या संदर्भाची, व्यक्तिवैशिष्टय़ांनुसार (उदा. पुरुष, स्त्री, गर्दी, विद्यार्थी इ.) भाषेच्या वापरासंबंधी औचित्याची जाण मर्यादित आहे. या सगळ्याबद्दल ते जरी अचूक आकडेमोड देऊ शकत असले तरी बोलताना संदर्भात अनोळखी फेरबदल झालेला हाताळणं त्यांच्या आवाक्यात नाही. गंमत म्हणजे, असा हिशेब जरी देण्यास असमर्थ असला तरी सामान्य मानवप्राणी मात्र संदर्भानुसार सुसूत्रपणे बोलू-समजू शकतो. कुत्रिम बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्ता यात मुख्य फरक आहे तो हाच. पुढील उदाहरणात कोक, केचप आणि बर्गर सर्व कसे करायचे ही गोष्ट सामान्य माणसाला जरी लगेच लक्षात आली असती तरी या चॅटबॉटच्या लक्षात आलेली नाही. उदा. http://www.artificial-intelligence.com/comic/11 आज तंत्रज्ञान क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आपण प्रचलित भाषेनुसार आपण तिला चॅटबॉट म्हणू, चच्रेचा विषय आहे. चॅटबॉटमुळे संगणक आणि मोबाइल क्षेत्रासह इतर सर्व क्षेत्रांत क्रांती होणार, अशी भाकितंही केली जात आहेत. साधारण दशकभरापूर्वी आलेल्या डॉट कॉम क्रांतीसारखीच किंबहुना त्याहून अधिक उत्सुकता हे तंत्रज्ञान वापरून तयार केल्या जाणाऱ्या उत्पादनांबद्दल लोकांच्या मनात जागी झालेली आहे. विविध क्षेत्रांत यांच्या वापराबद्दलचे प्रयोग जोरात सुरू आहेत. सोशल नेटवìकगसारख्या किफायतशीर प्रयोगशाळांमधून त्यांची पडताळणी होत आहे. कित्येक कंपन्या अहमहमिकेने या क्षेत्रात उतरलेल्या आहेत. निर्माण केली गेलेली उत्पादने मर्यादित काळात, मर्यादित उपयोगितेसह आजमावली जात आहेत. आणि विशेष म्हणजे काही अपवाद वगळता ती अतिशय यशस्वी ठरत आहेत. भारतातही बरेच चॅटबॉट्स वापरात आहेत, कदाचित आपणही सिटीबँकेचा व्हच्र्युअल असिस्टंट आस्क मी, स्टॉक्सच्या किमतींबद्दल विश्वासार्ह माहिती पुरवणाऱ्या एमी, मुंबई, दिल्ली, पुणे आणि अहमदाबाद शहरातील ऑटोरिक्षा आणि टॅक्सीभाडय़ाची गोळाबेरीज सांगणाऱ्या रिकफरे हे चॅटबॉट वापरले असतील आणि त्यावरून थोडक्यात या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराविषयीची कल्पना आपणास आली असेल. वरील उदाहरणं अतिशय मर्यादित क्षमतेच्या चॅटबॉटची आहेत. चॅटबॉट्स मुख्यत्वेकरून वैद्यकीय क्षेत्रातही मोठय़ा प्रमाणात वापरले जाण्याच्या शक्यता पडताळून पाहण्यात येत आहेत. त्यावरून त्यांची क्षमता किती असू शकेल याचा अंदाज बांधता येईल. काही मुख्य चॅटबॉट्स: वेब हल – झॅबवेयर या कंपनीतर्फे बनविलेला सुबक चॅटबॉट आहे हल कंपनीतर्फे आपली ओळख करून देताना हा बॉट स्वतबद्दल सांगतो की, मी झाबवेयरच्या अत्याधुनिक हल तंत्रज्ञानावर आधारित आहे. साध्या इंग्रजी भाषेत आपण माझ्याशी संवाद साधू शकता. यात दिलेल्या चौकटीत टाइप करा आणि माझ्याशी बोला. www.Zabware.com या संकेतस्थळावर या बॉटबद्दल संपूर्ण माहिती, उदाहरणे आणि काही कॉमिक्स दिलेली आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील वापरानुसार त्याच्या वेगवेगळ्या आवृत्त्या कंपनीने बाजारात आणलेल्या आहेत. यात छापील अक्षरे वाचून दाखविणारा बॉटही आहे. झिरो – हा दुसरा व्यवस्थित चॅटबॉट कॉम्प्युटर होप कंपनीतर्फे बाजारात आणला आहे. कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार याची निर्मिती त्यांच्या वेबपेजवरील भाषेच्या सहज प्रक्रिया आणि त्यामागील अस्पष्ट तर्काबद्दलची जाण विकसित करण्यासाठी केलेला आहे. याचा वापर करून संगणकासंबंधी दिलेल्या प्रश्नोत्तरी मंजूषेतील नेमके संदर्भ शोधण्यासाठी याचा वापर करता येतो. याव्यतिरिक्त जॅबरवकी, एलिझा, ब्रेन बोट, अरिसा, जीटॉक, ट्विटर, किमबॉट, ओपन पॅनडोरा, बोटस्टर, कॉल्युमबिना, सिमसिमी, क्लेव्हरबोट वगरे प्रसिद्ध चॅटबॉट्स सध्या इंटरनेटवर वापरात आहेत. उत्तम चॅटबॉक्सला बक्षिसे देण्याऱ्या ‘चॅटरबॉक्स चॅलेंज विनर्स’सारख्या संस्थासुद्धा आहेत. भारतात फेसबुक वापरणाऱ्यांसाठी हल्लीच फेसबुकतर्फे लायब्रेट चॅटबॉट उपलब्ध करून दिलेला आहे. मेसेंजरमधून भारतात फेसबुकचा वापर करणारे आता या चॅटबोटकडून सल्ला आणि आरोग्यासंबंधी माहिती मिळवू शकतात. या चॅटबॉटकरवी डॉक्टरांशी संपर्क साधता येतो. आजमितीला या चॅटबोट पॅनलवर तब्बल एक लाख डॉक्टरांचा ताफा असल्याचा फेसबुकचा दावा आहे. सध्या ही सोय केवळ आयओएसच्या फोन वापरणाऱ्यासाठीच उपलब्ध आहे. पण पुढे यातून हवामानासंबंधी, वाहतुकीसंबंधीची माहिती इत्यादी सार्वजनिक उपयोगाच्या माहितीसह प्रवासाच्या तिकिटांचे आरक्षण, आपल्या बँकेशी संवाद इत्यादी इतर काही सोयी वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्सवर सर्व स्मार्ट-मोबाइलधारकांना चॅटबॉटकरवी देण्याचा फेसबुकचा विचार असल्याचे समजते. आपले बॉट इतर बॉटपेक्षा वेगळे कसे याबद्दल फेसबुक सांगतो की, मोबाइलवरून लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या सगळ्यांच्याच हे बॉट्स कामी येणार आहेत आणि येत्या काही काळात छोटय़ा-मोठय़ा बऱ्याच कंपन्या ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी मेसेंजरवर आपापले बॉट्स तयार करताना दिसून येतील. क्लिक करणे किंवा माऊस चालवणे याऐवजी भविष्यात प्रत्यक्ष संभाषणानेच या बॉट्सकरवी संवाद साधला जाणार आहे आणि कामेही करविली जाणार आहेत, असे आपल्याला म्हणता येईल. गंमत म्हणजे, वर्गात दोन मुलं बोलताना दिसली की शिक्षक त्यांना धडय़ावर लक्ष द्यायला सांगतात, हे आपल्या नित्य परिचयाचं आहे, कारण वर्गात आपापसातील बोलणं शिक्षणाच्या आड येतं, अशी सामान्य समजूत आहे. मात्र सध्या शैशवावस्थेत असलेले चॅटबॉट्स आपल्या ज्ञानाची वृद्धी इतरांशी होणाऱ्या संभाषणातूनच वृद्धिंगत करणार आहेत. त्यांच्याशी होणारं संभाषण एकीकडे अतिशय उत्सुकता वाढविणारं असेल तर दुसरीकडे अतिशय वेताग देणारंही ठरेल. उदाहरणादाखल आपण जॅबरवकीशी संभाषणाचा या संकेतस्थळावर नमुना पाहू शकता – www.jabberwacky.com/ यामुळे ब्लूमबर्गच्या साइटवर दिलेल्या एका लेखात मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ सत्या नाडेलासुद्धा म्हणताना आढळतात की, चॅटबॉटला काही विचारायची धास्ती वाटते, कारण बॉट काय बोलेल याचा काही नेम नसतो. मायक्रोसॉफ्टने २३ मार्चला ‘टाय’ (थिंकिंग अबाउट यू) नावाचा बॉटचे किक, ग्रुप मी आणि ट्विटरवर अनावरण केले. ‘टाय’बॉट मुख्यत्वेकरून तरुणाईसाठी बनविलेला आहे. इतरांशी होणाऱ्या संवादातून या बॉटची कृत्रिम बुद्धी विकसित होत असल्याचे लक्षात आल्यावर काही खोडसाळ लोकांनी ‘टाय’ला त्याच्या अवतरित होण्यानंतरच्या काही तासांतच वर्णद्वेषी शब्द बोलणं शिकवलं आणि ‘टाय’ने सरळ बुशसाहेबांवर त्याचा प्रयोग केला. पण, सुरुवातीचे हे काही ठसके सोडले तर बॉट नेटक्या चालीने प्रगती करणार हे निश्चित. मायक्रोसॉफ्टचाच एआय बॉट कॅन्सर आणि मल्टिपल स्क्लेरॉसिससारख्या रोगांवर उपचारपद्धती विकसित करण्यात मदत करत आहे. फेसबुक, अ‍ॅमेझॉनसारख्या कंपन्याच नव्हे तर मायक्रोसॉफ्ट, गुगल आणि आयफोनसारखे मातब्बरही बॉटनिर्मितीच्या या गदारोळात अहमहमिकेने उतरले आहेत. मोबाइल आणि संगणकाद्वारे गप्पा मारणारा, मदत करणारा, माहिती देणारा असा हा सवंगडी भारतातही खूप उपयोगी ठरेल यात शंका नाही. अर्थात, ही कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी बुद्धिमत्तेसाठी कधीही आव्हान उभे करू शकणार नाही हे मात्र तितकेच खरे.