Friday, 22 January 2016

मशरूम । वयवसाय

लखपती बनविणारे मशरूम एखाद्याने तीन एकरांच्या जागेत आपण रोज १ लाख रुपयांची भाजी विकतो व १०० जणांना प्रदीप नणंदकर | January 21, 2016 3:05 AM  242  2 Google +4 WhatsApp37  309 एखाद्याने तीन एकरांच्या जागेत आपण रोज १ लाख रुपयांची भाजी विकतो व १०० जणांना नोकरी देतो, असे जर सांगितले तर असे सांगणाऱ्या माणसाला बहुधा वेड लागले आहे असाच समज कोणीही करून घेईल. पण, लातुरात ही यशोगाथा प्रत्यक्षात साकारली गेली आहे.. भाजीपाल्याचा व्यवसाय करणारे छोटे शेतकरी आपण अनेक ठिकाणी पाहिले आहेत. या व्यवसायाचे वेगळे वैशिष्टय़ म्हणजे दररोज हातात खुळखुळणारे पसे. बरेच शेतकरी या पशातून घरखर्च चालवतात. भाजीपाल्याचे चांगले उत्पादन आले तरी वर्षांकाठी दोन, चार लाखांच्या पुढे कोणी सरकत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेडनेट शेतीत उत्पन्न घेणारे शेतकरीही प्रत्येक तालुक्यात वाढत आहेत. वर्षांकाठी १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळविणारे शेतकरी आता काही प्रमाणात आहेत, मात्र एखाद्याने तीन एकरांच्या जागेत रोज १ लाख रुपयांची भाजी आपण विकतो व १०० जणांना नोकरी देतो, असे जर सांगितले तर असे सांगणाऱ्या माणसाला बहुधा वेड लागले आहे असाच समज कोणीही करून घेईल. गेल्या दीड वर्षांपासून लातूर तालुक्यातील माटेफळ या उजाड माळरानावर अभियंते प्रकाश लातुरे यांनी ही अशक्य कोटीतील गोष्ट शक्य करून दाखवली आहे. यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्रकाश लातुरे हे शेतकरी नाहीत. ते अभियंते आहेत. आपल्या ज्ञानाचा उपयोग करून समाजातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे, व्यवसाय करताना तो पर्यावरणपूरक असावा व इतरांपेक्षा काही वेगळा व्यवसाय करावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती. आपण व्यवसाय ग्रामीण भागात सुरू केला व तो शेतीसंबंधी असेल व शेतीत आपल्या परिसरात आतापर्यंत तो कोणीच केला नाही असा वेगळा प्रयोग आपण यशस्वी करून दाखवला तर त्यातून शेती ही पारंपरिक पद्धतीने करण्याची गोष्ट नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिकलेल्या तरुणांनी जिद्द बाळगून काम केले तर आपल्या गावातही कोणत्याही मोठय़ा शहरात जाऊन उद्योग करण्यापेक्षा चांगला आíथक लाभ देणारा उद्योग चालवू शकतो याचा वस्तुपाठच त्यांनी उभा केला आहे. आपल्या मित्रांसोबत चर्चा करून राज्यात शेतीतील वेगळे प्रयोग अभ्यासण्यासाठी काही काळ प्रकाश लातुरे यांनी वेळ खर्ची घातला. घरची उद्योगाची पाश्र्वभूमी होती. कुटुंबीयांना आपण पारंपारिक उद्योगापेक्षा कृषी आधारित उद्योग उभारणार असून त्याला सर्वानी मदत केली पाहिजे, असे सांगितले व कुटुंबीयांनीही त्यांच्या पाठीमागे भरभक्कम आधार उभा केला. लातूरपासून ३५ किलोमीटर अंतरावर शेती खरेदी केली. त्या शेतीत िवधनविहीर, विहिरी आहेत हे पाहिले. शेतीच्या पोतापेक्षा परिसराला महत्त्व दिले व मशरूम या फळभाजीचे उत्पादन सुरू करण्याची खुणगाठ मनाशी बांधली. यासाठी लागणाऱ्या तांत्रिक विषयांचा अभ्यास केला. हिमाचल प्रदेशातील सोलन येथील आयसीएआरमार्फत चालवल्या जाणाऱ्या मशरूम केंद्राचे मार्गदर्शन घेतले व २०१३ साली तीन एकर जागेवर सुमारे ५ कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प सुरू करण्याचा मनोनिश्चय केला. अनंत अडचणींवर मात करीत तो प्रकल्प उभा राहिला. पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड अशा डोंगराळ भागात कमी तापमान असते. त्या तापमानाचा लाभ घेत त्या परिसरात मशरूमचे उत्पादन हा कुटिरोद्योग आहे. अनेक शेतकरी हा व्यवसाय करतात. तिकडे भाजीच्या बाजारपेठेत मशरूम विकला जातो व सणावाराला मशरूमची भाजी खाण्याची प्रथा आहे. आपण वर्षांत कदाचित एखादे वेळा मशरूमची चांगल्या हॉटेलमध्ये गेलो तर भाजी खातो. संपूर्ण जगभरात शाकाहारी पदार्थात ९१ टक्के प्रोटीन असणारा व शून्य टक्के फॅट, कोलेस्टेरॉल असलेला हा एकमेव पदार्थ आहे. त्यामुळे मशरूमचा खाद्यान्न म्हणून जगभरात मोठय़ा प्रमाणावर वापर होतो. पूर्व आशियाई देशात याचा वापर सर्वाधिक आहे. मुख्य म्हणजे ही फळभाजी पूर्णपणे सेंद्रीय आहे. रासायनिक पदार्थाचा वापरच होत नाही, त्यामुळे ती भेसळ करून बनवता येत नाही. यात असणारे प्रोटीन हे प्राथमिक दर्जाचे आहे, म्हणजे शरीरास जसे हवे तसे ते आहे. डाळ, बदाम यातही प्रोटीनचे प्रमाण अधिक असले तरी ते दुय्यम दर्जाचे आहे. मशरूमचा वापर ज्या देशात मोठय़ा प्रमाणावर होतो तेथे दरडोई वर्षांला ७० किलोपर्यंत त्याचा वापर होतो. भारतात हे प्रमाण केवळ अर्धा किलो इतके आहे. उच्चभ्रू लोकच याचा वापर करतात. उत्तरेप्रमाणेच तामिळनाडू, कर्नाटक या परिसरातही मशरूमचे उत्पादन घेतले जाते. लग्नसमारंभात या भाजीला मानाचे स्थान आहे. प्रोटीन शरीरात घेण्यासाठी मटन, मासे, दूध, सोयाबीन याचा वापर होतो मात्र शून्य कोलेस्टेरॉल असणारा एकमेव पदार्थ म्हणून मशरूमची ओळख आहे. मशरूम तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे शेतीत ज्याला टाकाऊ पदार्थ म्हणून ओळखले जाते अशी सोयाबीन व गव्हाची गुळी, शिवाय साखर कारखान्यात शिल्लक राहिलेला बगॅस (उसाचा रस काढून शिल्लक राहिलेला चोथा) याला सर्वाधिक महत्त्व आहे. २५ दिवसात या कच्च्या मालाचे खत तयार केले जाते. त्यात कोंबडीची विष्ठा, जिप्सम, डिओसी मिसळून त्यानंतर मशरूमचे उत्पादन मिळण्यासाठी ५० दिवसांचा कालावधी लागतो. पुढील १५ ते २० दिवस हे उत्पादन विक्रीस उपलब्ध होते. आपल्या देशात १९६८ साली आयसीएआर दिल्ली येथे हिमाचल प्रांतातील सोलन येथे मशरूमचे संशोधन करणारे केंद्र सुरू झाले. मशरूम म्हणजे बुरशीवर्गीय भाजी आहे. जगभरात सुमारे १७ ते १८ हजार याचे प्रकार आहेत. मात्र खाण्यासाठी बटन मशरूम, ऑइस्टर, मिल्की या तीन प्रकारांना सर्वाधिक मागणी आहे. उर्वरित प्रकाराचे औषधी व विविध लाभ आहेत. भारतात प्रारंभीच्या काळात विदेशी कंपन्या मोठय़ा प्रमाणावर मशरूमचे उत्पादन घेण्यासाठी उतरल्या. मात्र मिळणारा कच्चा माल, कर्मचारी व्यवस्थापन व बाजारपेठेतील कमी असलेली मागणी यामुळे सुरुवातीच्या काळात ८० पेक्षा अधिक असलेले प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद पडत पाच ते सहाच शिल्लक राहिले. हा काळ होता १९९२ ते ९४ सालचा. ट्रान्सकेमसारख्या विदेशी कंपन्यांनी यात धाडस केले होते. सध्या देशात विकफिल्ड व प्रीमियर या दोन कंपन्यांचे उद्योग अद्यापही सुरू आहेत. २००५ नंतर देशी उद्योगाने यात सहभाग घेण्यास सुरुवात केली. तरीदेखील देशात सध्या केवळ १७ ते १८ उद्योग सुरू आहेत, त्यांपकी महाराष्ट्रात सात ठिकाणी हे उद्योग चालतात. पुणे येथे २, ठाणे जिल्हय़ात १, बारामतीत १, इस्लामपुरात १, अकोल्यात १ व मराठवाडय़ात लातूर येथील एकमेव असे सात प्रकल्प आहेत. हा प्रकल्प चालवताना तो संपूर्णपणे वातानुकूलित यंत्रणेत चालवावा लागतो. १८ डिग्रीपेक्षा कमी तापमानातच मशरूमची वाढ होते. २४ तास व ३६५ दिवस हा उद्योग चालवावाच लागतो. तो एकही दिवस बंद ठेवता येत नाही. भारतात बटन मशरूमचे ९९ टक्के उद्योग यशस्वी झाले आहेत. या प्रकल्पासाठी दररोज ६० हजार लिटर पाणी लागते. प्रकाश लातुरे यांनी माटेफळ परिसरातील १० ते १५ गावांतील ११० जणांना रोजगार दिला. गावात मिळणाऱ्या शेतीपेक्षा कमी काम असते. ते वातानुकूलित जागेत करावे लागत असल्यामुळे फारसा त्रास नाही, मात्र कामाचे सातत्य ठेवले पाहिजे ही अट घातली व गेल्या दीड वर्षांपासून अखंडपणे हा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पासाठी वीज उपलब्ध व्हावी यासाठी साडेसात किलोमीटरची स्वतंत्र लाइन अंथरून एक्स्प्रेस फिडरची उभारणी करण्यात आली. ५ मे २०१४ साली पहिले उत्पादन हाती आले. दर तीन दिवसांनी साडेतीन टनाची बॅच घेतली जाते. ३६५ दिवस रोज सरासरी एक टनाचे उत्पादन घेतले. बाजारपेठेत किमान भाव १३० रुपये किलो आहे. माटेफळहून सोलापूपर्यंत हा माल वाहनाने पाठवला जातो. तेथून रेल्वेने मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद येथे हा माल विकला जातो. हॉटेल, मॉल व किरकोळ बाजारपेठेत या मालाची विक्री होते. दररोज किमान १ लाख रुपये मिळतात. ग्रामीण भागातील टाकाऊ पदार्थापासून व ग्रामीण भागातील लोकांची क्रयशक्ती वापरून तयार झालेला माल शहरात पाठवून शहरातील पसे ग्रामीण भागापर्यंत आणले जातात. तीन एकर जागेत १०० लोकांना वर्षभर रोजगार देऊन रोज १ लाखाचे उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता शेतीच्या उद्योगात आहे. वर्षांला तीन एकरांत ४ कोटीचे उत्पन्न मिळते याचा अनुभव लातुरे यांनी घेतला आहे. तीन एकरांत १० हजार रुपयांचे उत्पन्नही मिळत नाही अशी स्थिती एकीकडे तर दुसरीकडे सर्व बाबी जुळवून आणून अविश्रांत मेहनत, कल्पकता व सर्वाना सोबत घेऊन जाण्याची कला याचा योग्य संगम घडवून आणल्यामुळे लातुरे यांनी हे स्वप्नवत वाटणारे काम प्रत्यक्षात उतरवून दाखवले आहे. ‘आदी एॅग्रो प्रॉडक्ट्स’ या नावाने देशातील बाजारपेठेत वेगळी ओळख निर्माण केली आहे. आयसीएआरने या कामाची दखल घेऊन लातुरे यांचे कौतुकही केले आहे. १०० टन टाकाऊ पदार्थापासून १५ टन मशरूमचे उत्पादन होते. उर्वरित ८५ टनाचा वापर खतनिर्मितीसाठी केला जाऊ शकतो. लातुरे यांनी पहिल्या टप्प्यात ५०० टन खताचे उत्पादन घेतले आहे व हे खतही २५ रुपये किलो दराने आजूबाजूचे शेतकरी खरेदी करत आहेत व या खताचा त्यांना चांगला लाभ मिळतो आहे. शिकल्या सवरल्या मंडळींनी शेतीला प्राधान्य दिले पाहिजे. काहीच जमत नाही म्हणून शेतीकडे वळण्याऐवजी ज्यांना काहीही जमू शकते अशा मंडळींनी शेतीकडे वळण्याची गरज आहे. उद्योगातून आíथक प्राप्ती ही एक बाजू असली तरी आपल्या परिसरातील शेतकरीबांधवांत आत्मविश्वास निर्माण करणे व शेतीची क्षमता शेतकऱ्यांच्या समोर आणणे हा आपला महत्त्वाचा उद्देश असल्याचे लातुरे सांगतात. मशरूम व्यवसायाला प्रचंड संधी देशभरात सध्या दररोज २०० टन म्हणजे वर्षांला ७३ हजार टन मशरूम उत्पादन होते. खाण्याच्या बाबतीत मधुमेह, हृदयरोग या वाढत्या आजारामुळे लोकांत जागृती वाढली आहे. या आजाराला निमंत्रण देणार नाही असे पदार्थ खाण्याकडे आता कल वाढतो आहे त्यामुळे देशाच्या गरजेच्या तुलनेत मशरूमचे उत्पादन अत्यल्प होते. या क्षेत्रात नव्याने उतरण्याची मोठी संधी आहे. हा व्यवसाय करणाऱ्या तरुणांसाठी केंद्र शासनाचे ३० लाख रुपयांचे अनुदानही उपलब्ध आहे. प्रदीप नणंदकर, लातूर pradeep.nanandkar@expressindia.com First Published on January 21, 2016 3:05 am Web Title: A Story Of Successful Business टॅग Successful Business  242  2 Google +4 WhatsApp37  309

No comments: