Thursday, 20 April 2017

रेशनकार्ड मिळवायचे कसे

रेशनकार्ड मिळवायचे कसे?
कोणत्याही सरकारी कामासाठी सरकारी कार्यालयात गेल्यानंतर रेशनकार्ड आहे का? अशी विचारणा केली जाते. काही कारणाने स्वतःचे रेशनकार्ड नसणे, रेशनकार्ड हरवणे किंवा खराब झालेले रेशनकार्ड बदलून घेण्याची प्रक्रिया किचकट असल्याचे समजले जाते, पण, योग्य कागदपत्रे योग्य ठिकाणी सादर केली तर ही प्रक्रिया अधिक सोपी होऊ शकते. सध्या रेशनकार्ड महिलांच्या नावावरच मिळते. त्यादृष्टीने कार्डचे वेगवेगळे प्रकार कोणते आणि नवीन कार्ड कसे मिळवावे याबाबत. म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर अंत्योदय योजनेतील लोकांना सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा प्राधान्याने लाभ दिला जातो. प्राधान्य गटातील रेशन कार्डधारकांमध्ये दारिद्र्य रेषेखालील १०० टक्के लोकांचा सहभाग असतो. तर ४४ हजार रुपयांच्या आत उत्पन्न असलेल्या गावातील एकूण लोकसंख्येच्या ७६ टक्के लोकांना याचा लाभ मिळतो. ग्रामीण भागातील प्रमाण हे ७६ टक्के आहे तर शहरी भागातील प्रमाण ४५ टक्के आहे. प्राधान्य गटातील रेशनकार्डधारकांना २ रुपये किलो दराने गहू देण्यात येतो. तर ३ रुपये किलो दराने तांदूळ दिला जातो. त्याबरोबरच १५ रुपये ८१ पैसे दराने रॉकेल दिले जाते. पांढरे कार्ड व दोन गॅस असलेल्या रेशनकार्डधारकांना रॉकेल दिले जात नाही तर एक गॅस असलेल्या रेशनकार्डधारकाला उपलब्धतेनुसार रॉकेल दिले जाते. ग्रामीण भागात ७६ टक्के लोकांना योजनेचा फायदा द्यायचा असल्याने त्याचे लाभार्थी कोण असतील हे ठरविण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे. ग्रामसभा जे सांगेल त्याच व्यक्ती सरकार यादीत असतील. रेशनकार्डचे प्रकार अंत्योदय रेशनकार्ड - अंत्योदय योजनेतील लाभधारक प्राधान्य गट रेशनकार्ड - वार्षिक ४४ हजारांच्या आतील उत्पन्न असलेले केशरी रेशनकार्ड - १ लाखाच्या आता आणि ४४ हजारांपेक्षा अधिक पांढरे रेशनकार्ड - १ लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेले व्यक्ती नवीन रेशनकार्ड कधी मिळते? रेशनकार्ड हरवले असेल तर दुबार रेशन कार्ड काढावयाचे असल्यास रेशनकार्ड खराब झाले असेल तर कुटुंब विभक्त झाले असेल तर रेशनकार्डामध्ये नाव वाढवायचे असेल तर रेशनकार्डमधून नाव कमी करणे व्यक्ती स्थलांतरित झाली असल्यास आवश्यक कागदपत्रे तलाठी रहिवासी दाखला व उत्पन्नाचा दाखला लाइट बिल, घरफाळा पावती घरमालकाचे संमतीपत्र १० रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प प्रतिज्ञापत्र (अॅफिडेव्हीट) धान्य दुकानदाराचे पत्र आधार कार्ड झेरॉक्स बँक पासबुक झेरॉक्स व महिलेचे दोन फोटो नवीन रेशनकार्ड कोणाला मिळते आणि कागदपत्रे बाहेरगावाहून आलेले असल्यास : बाहेरगावाहून आलेले असल्यास त्याठिकाणच्या संबंक्षित सक्षम अधिकाऱ्याचा (तहसिलदार) स्थलांतराचा दाखला, रेशनकार्ड मूळप्रत. ज्यांचे रेशनकार्ड कोठेच नाही : रेशनकार्डमध्ये कोठेच नाव नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र, तलाठ्याचा रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, लाइटबिल, भाडेकरू असल्यास घरमालकाचे संमतीपत्र, आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक व ज्या महिलेच्या नावाने कार्ड काढावयाचे आहे त्यांचे दोन फोटो. विभक्त कुटुंब असेल तर : वरील कागदपत्रांशिवाय विभक्त राहत असल्याचा सरकारी पुरावा उदा. लाइटबिल, घरफळा पावती, ग्रामपंचायत असेसमेंट उतारा यापैकी एक पुरावा. विभक्त राहत असल्याचे प्रतिज्ञापत्र वडिलांनी किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तीने लिहून दिलेले असावे. रेशनकार्ड हरविले असल्यास : पोलिस स्टेशनचा कार्ड हरविल्याचा दाखला आणि वरील सर्व कागदपत्रे दुबार रेशन कार्ड काढावयाचे असल्यास : रेशनकार्ड हरविले किंवा खराब झाल्यास दुबार रेशनकार्ड काढता येते. हरविले असल्यास पोलिसांचा दाखला तर खराब झाले असल्यास मूळ रेशनकार्डची प्रत अर्जासोबत जोडावी लागते. नाव वाढवायचे असल्यास : मूळ रेशनकार्ड, नाव कमी करून आणल्याचा संबंधित अधिकाऱ्याचा दाखला, लग्नामुळे नाव वाढवायचे असेल तर लग्नपत्रिका किंवा यादी पुरावा, विवाह नोंदणी दाखला. लहान मुलगा असेल तर सहा वर्षाच्या आतील मुलांसाठी जन्मदाखला तर सहा वर्षावरील मुलांसाठी जन्मदाखला, शाळेचा दाखला आणि प्रतिज्ञापत्र नाव कमी करणे : मयत दाखला किंवा लग्न झाले असल्यास लग्नपत्रिका किंवा यादी. स्थलांतरीत होऊन आले असल्यास : ज्या कारणाने स्थलांतर झाले आहे त्याचे सक्षम अधिकाऱ्याचा दाखला. रेशनविभागाकडून तपासणी, चौकशी आणि त्यानंतरच कार्ड मिळते. रेशनकार्ड काढण्यासाठी तहसील कार्यालयात येण्याची गरज नाही. तर गावागावांत असलेल्या किंवा सर्कलमध्ये असलेल्या महा इ सेवा केंद्रात ही सुविधा उपलब्ध आहे. त्याठिकाणी जाऊन वरील कागदपत्रे सादर केल्यास नवीन रेशनकार्ड किंवा नाव कमी करणे आणि वाढवून मिळण्याचे काम होऊ शकते. त्याठिकाणाहून तहसिल कार्यालयात रेशनकार्ड येते आणि त्याची तपासणी करून त्यावर संबंधितांची सही झाली की रेशनकार्ड तयार होते.

No comments: