Saturday, 12 March 2016

ऑनलाइन बँकिंग

ऑनलाइन बँकिंगचे फायदेच फायदे !  Online बँकिंग करत नसाल तर ते करण्याचा प्रयत्न आजपासूनच सुरु करा. एकदा बँकेकडून अशी परवानगी म्हणजे पहिले लॉगइन आणि पासवर्ड मिळाला की नंतर आपल्याला बँकेत जाण्याची क्वचितच गरज पडते. असे करताना डेबिट कार्डही घेवून टाका. म्हणजे आपल्या रांग न लावता खात्यातून पैसे केव्हाही काढण्याची सोय झाली.  घरी बीएसएनएल किंवा कोणतेही ब्रॉडबँडचे कनेक्शन घ्या. ते स्वस्त पडते शिवाय वेगही चांगला मिळतो. नव्याने व्यवहार करताना घरातील डेस्कटॉपवरच बँकिंग करा. बाहेर कोठे किंवा मोबाईलवर करू नका.  ऑनलाइन बिल भरण्याची सोय ज्यांनी केली आहे, ती बिले आपल्या खात्याशी जोडा. (उदा. वीज, फोन, मोबाईल, सोसायटी, महापालिका) ती जोडली आणि एक तारीख ठरविली तर त्या त्या महिन्याचे बिल आपोआप जात राहते. शिवाय त्याचे रेकॉर्डही तयार होते. बिल तपासून मगच भरणेचे असल्यास ती न जोडता त्या त्या तारखेला त्या त्या संस्थेच्या वेबसाईटवर view bill and pay असा ही पर्याय असतो. त्यावर बिल क्रमांक टाकला की आपले बिल दिसते. ते तपासून आपण ते ऑनलाइन भरण्याचे टप्पे पूर्ण करू शकतो.  शेवटच्या टप्प्यात आपल्या मोबाईलवर एक OTP (म्हणजे एक आकडा) येतो. तो भरला की काही क्षणात बिल भरले जाते. आपल्या खात्यात तेवढी रक्कम डेबिट म्हणजे वजा झाल्याचा एसएमएस येतो. एवढेच नव्हे तर ज्यांचे बिल भरले, ती संस्थाही आपल्याला एसएमएस पाठविते. पैसे दुसऱ्याच्या खात्यात जमा करण्यासाठी 'एनईएफटी' आणि 'आरटीजीएस' ची सोय आहे. ज्याला पैसे पाठवायचे आहेत (बेनिफिशरी) त्याचा अकाउंट नंबर आणि बँकेचा आयएफएससी कोड त्यासाठी लागतो. ज्या संस्था किंवा व्यक्तींच्या नावावर आपल्याला नेहमी पैसे भरावे लागतात, त्यांची नोंदणी आधी बँकेच्या साईटवर करावी लागते. त्याला बँक एका दिवसांत परवानगी देते. किती पैसे ट्रान्सफर करावयाचे आहे, त्याची एक मर्यादा ठरवावी लागते. म्हणजे त्यापेक्षा कमी किंवा तेवढीच रक्कम ट्रान्सफर होते. हे करतानाही OTP लागतो. या व्यवहारांची नोंद त्या साईटवर राहते आणि ती आपण केव्हाही पाहू शकतो. आपल्याला लक्षात आले असेल की या प्रत्येक वेळी आपल्याला आकडे आणि पासवर्ड नेमके टाकण्याची काळजी घ्यावी लागते. पण त्याचीही काळजी ऑनलाईन व्यवहारानी घेतली आहे. उदा. पैसे ट्रान्सफरमध्ये बेनिफिशरीचा अकाउंट नंबर दोन वेळा द्यावा लागतो. तसेच, अकाउंट नंबर आणि आयएफएससी कोड जुळत नसेल तर ग्राहकांची एन्ट्री स्वीकारली जात नाही. शिवाय, बेनिफिशरी नोंदवल्यानंतर पुढील अर्धा तास कोणताही व्यवहार करता येत नाही. काही बँका बेनिफिशरीचा मोबाइल नंबरही घेतात, जेणे करून बेनिफिशरीनाही एसएमएसद्वारे कळविता येऊ शकेल.  ==============================N R Isal =============================== ऑनलाईन व्यवहारात चुका होण्याची शक्यता खूप कमी असते, पण पैसे चुकीच्या खात्यात जमा झाले असल्याचे लक्षात आल्यास लगेच बँकेला कळविले तर ते पैसे पुन्हा आपल्या खात्यात जमा होऊ शकतात, अर्थात त्यासाठी ज्याच्या खात्यात ते चुकून गेले आहेत, त्याची त्यासाठी परवानगी घ्यावी लागते. अशा अपघातांची शक्यता इतकी कमी आहे की ती काळजी आपण करण्याचे कारण नाही ============================ ============================= ऑनलाईन खरेदी करणे, विमान, रेल्वे, बस, सिनेमांची तिकिटे घरी बसून काढणे, हे ऑनलाईन व्यवहारांमुळेच शक्य होते. अनेक जण क्रेडीट कार्ड त्यासाठी वापरतात, मात्र त्यामुळे अधिक खर्च होण्याची शक्यता असते. डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगमध्ये आपलेच पैसे आपण वापरत असल्याने तो धोका नसतो.  ऑनलाइन गुंतवणुकीचे अनेक मार्ग आता उपलब्ध आहेत, त्याचा फायदा घेण्यासाठी इंटरनेट बँकिंग लागते. विशेषत: डीमॅट खाते आपणच आपले ऑपरेट करायचे असेल तर इंटरनेट बँकिंग सोयीचे ठरते.  सायबर क्राईमची माध्यमांत चर्चा अधिक होत असल्याने ऑनलाइन व्यवहार सुरक्षित नाही, असा समज होऊ शकतो. मात्र त्याला बळी न पडता थोडी काळजी घेऊन आपण अशी फसवणूक टाळू शकतो. आपला पासवर्ड कोणाला न सांगणे, तो अधूनमधून बदलत राहणे, आपला मोबाईल इतरांच्या हातात असताना व्यवहार न करणे, बँक अथवा कोणीही ही माहिती विचारली तरी त्याची माहिती न देणे, एवढी जरी काळजी घेतली तरी फसवणूक होण्याची अजिबात शक्यता नाही. ऑनलाईन व्यवहार ही नव्या काळाची गरज असून ती अतिशय सोपी आहे आणि तिचे फायदेच फायदे असल्याने ते व्यवहार आपण शिकून घेतले पाहिजेत. =======================  www.eschool2all.blogspot.com

No comments: